२८ मे २०२६
मालेगाव (भ्रमर वार्ताहर) :- वारंवार सूचना देऊनही मोसम नदी बकरी ईदच्या दिवशी प्रदूषित झाली आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. त्यामुळे मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने शहर अभियंतासह सहाय्यक आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक अशा तिघांना तातडीने निलंबित केले आहे. महानगरपालिका आयुक्तांनी हे आदेश गुरुवारी तातडीने तिघांनाही बजावले आहेत.
येथील मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी येऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले असताना देखील बकरी ईदच्या दिवशी मोसम नदीपात्रात रक्त मिश्रित पाणी वाहात असल्याने सार्वजिक नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे यांनी रक्तमिश्रित पाण्याचे शंखनाद करून जलपूजन दुग्धाभिषेक करणार असताना पोलीस प्रशासनाने त्यास मज्जाव केल्यानंतर बोरसे यांनी सांडवा पुलावर ठिय्या मांडून धरणे आंदोलन सुरू केले. त्याला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, अ. भा. मराठा महासंघाचे भरत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष देवा पाटील, मच्छिंद्र शिर्के व इतर कार्यकर्त्यांनी समर्थन दिले.
या आंदोलनाची दखल घेऊन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, मनपा आयुक्त रवींद्र जाधव, सह पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी चर्चा केली असता ठोस कारवाईची मागणी केली. यावर अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी मनपा शहर अभियंता कैलास बच्छाव, सहआयुक्त अनिल पारखे, प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांना निलंबित करण्याची सूचना केली. त्यावर मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी निलबनाचे आदेश जारी केले. त्याची प्रत आंदोलनकर्त्यांना दिली.
शहरातील बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे स्वतंत्र कारवाई करण्याचे व कामात हलगर्जी करणार्यांवर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी दिले, त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
Copyright ©2026 Bhramar