जेलरोडची
जेलरोडची "त्रिशा" प्रजासत्ताक दिनी करणार पंतप्रधानांसमोर संचलन
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील जेलरोड चंपानगर मधील रहिवासी व सुरक्षा रक्षकाची मुलगी त्रिशा प्रवीण दिवे हिची नवी दिल्लीत होणा-या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झाली आहे.


 उद्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांसमोर ती संचालन करणार आहे. त्रिशा ही नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयात एनसीसी वायू दलाची छात्रा आहे.


प्रवीण दिवे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती जेमतेम असून ही त्रिशा शाळेत चांगला अभ्यास करायची. बाल वयापासून खेळात तिची ओढ होती. त्रिशाने राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेत कांस्य पदक मिळवले असून अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे. बास्केट बॉलचीही ती खेळाडू आहे.


गोव्यात झालेल्या अखिल भारतीय बास्केटबॉल स्पर्धेत तीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. धुळे, सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ती सहभागी झाली. २०२३ मध्ये पुण्यात झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली. ती सध्या जेलरोड-कॅनलरोडवरील चंपानगरीत कुटुंबासह राहते. सेंट झेवियर्स शाळेची ती माजी विद्यार्थीनी असून नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात विज्ञान शाखेत व्दितीय वर्षात ती शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक शिबिरासाठी निवड करताना अनेक निकष असतात.


नऊ महिने कसून तयारी करावी लागते. त्रिशाने प्रजासत्ताक पूर्व शिबीरांतर्गत तीन महिने आर्टिलरी सेंटर मध्ये प्रशिक्षण घेतले. पुण्यातील आयजीसीसाठी तिची निवड झाली. त्यानंतर वार्षिक शिबीरात ती सहभागी झाली. तिच्या या यशाबद्दल, जिद्दीने केलेल्या प्रवासाबद्दल तीचे कौतुक होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group