FB Liveवेळी मी दरवाजा उघडला, मला बाहेर काढलं अन्...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
FB Liveवेळी मी दरवाजा उघडला, मला बाहेर काढलं अन्...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
img
Dipali Ghadwaje
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल(गुरूवारी) मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाचा घोसाळकर यांची ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या घटनेने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची हत्या केली, त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून त्यानेही आपलं जीवन संपवलं. 

फेसबुक लाईव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा असलेले अभिषेक दोन वेळा दहिसर कांदरपाडा ७ येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मुंबई बँकेच्या संचालकपदीही ते कार्यरत होते. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

आज सकाळी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.

प्रत्यक्षदर्शींनं काय सांगितलं? 
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी तिथे नेमकं काय झालं? तो थरारक अनुभव सांगितला. 

'एका वृत्तवाहिनी'शी बोलताना लालचंद पाल म्हणाले की, काल सकाळी अकरा वाजता अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला की, संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे. पण साडी वाटण्याआधी, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेले. मी त्यांच्यासोबत होतो. मॉरिसच्या कार्यालयात दोघंही बोलत होते. मी खूप वेळ झाल्यामुळे दरवाजा उघडूनमध्ये गेलो, तेव्हा दोघं मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्ह करत होते. मी गेल्यावर थोड्यावेळाने आम्ही येतो, असं बोलून मॉरिसने मला बाहेर काढलं, असं लालचंद पाल यांनी सांगितले. 

त्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी आत धावलो, तर अभिषेक हे खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेक यांच्यावर गोळीबार करत होता, असं लालचंद पाल यांनी म्हणाले. मॉरिस आणि अभिषेकमध्ये आधीच वाद झाला होता, तो संपवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेक यांचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवल्याची माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group