पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून RLD एनडीए आघाडीत जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यात आजच्या या घोषणेनं त्याला आणखी बळ मिळाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आणि इंडिया आघाडीला आणखी एक तडा गेला.  राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे एनडीएत सहभागी होणार असल्याच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.  

सरकारच्या या घोषणेमुळे इंडिया आघाडीतील RLD प्रमुख जयंत चौधरी भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न दिल्यानं जयंत चौधरी हे भाजपाच्या जवळ गेलेत. जयंत चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. चौधरी चरण सिंह हे जयंत चौधरी यांचे आजोबा आहेत. जयंत चौधरी यांना पत्रकारांनी एनडीएत सहभागी होणार का असा प्रश्न केला तेव्हा आता मी कुठल्या तोंडाने नकार देऊ असं सूचक विधान केले.
 
जयंत चौधरी म्हणाले की, आज देशासाठी खूप मोठा दिवस आहे. मी भावूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार मानतो. देश त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान मोदी देशाची नस अचूक ओळखतात. आज कमेरा समाज, शेतकरी आणि कामगारांचा सन्मान होत आहे. हे करण्याची क्षमता अन्य कुठल्याही सरकारमध्ये नव्हती. मला माझे वडील अजित सिंह यांची आठवण येते. मी किती जागा घेणार यापेक्षा मी कुठल्या तोंडाने नकार देणार आहे? जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार मी माझं म्हणणं मांडेन असं त्यांनी म्हटलं.

भाजपा आणि आरएलडी आघाडी निश्चित आहे. आरएलडी २ जागांवर निवडणूक लढेल. त्याशिवाय जयंत चौधरी यांच्या आरएलडीला राज्यसभेची एक जागा दिली जाईल. या दोन्ही पक्षांच्या आघाडीची लवकरच घोषणा होईल. पश्चिम यूपीत जाट, शेतकरी आणि मुस्लीम बहुल भाग आहे. याठिकाणी लोकसभेच्या २७ जागा आहेत, २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १९ जागा जिंकल्या होत्या. तर ८ जागांवर विरोधी पक्ष विजयी झाला होता. त्यातील ४ सपा, ४ बसपा यांच्या खात्यात होत्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group