मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा उद्घाटनापासूनच चर्चेत राहिला आहे. आधीच महामार्गावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. त्यातच आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर ठिकाठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय. त्यामुळे मृत्यूचा सापळा ठरत असलेला समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

समृद्धी महामार्गांवर जीवघेणा खड्डा पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे लोहोगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महामार्गालाच भगदाड पडल्याने समृद्धी महामार्गांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले. त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते. तेव्हा पुलाचा काही भाग कोसळला मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरु होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.