यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव हा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. एल्विशने एका दुसऱ्या यूट्यूबरला मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच तो पुन्हा अडचणीत सापडला आहे. आता एल्विश याला वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत खटल्याच्या संदर्भात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्या प्रकरणी यूट्यूबर एल्विश यादव याला रविवारी नोयडा पोलीसांनी अटक केली होती. पोलीसांनी यादव याला चौकशीसाठी बोलवलं होतं, मात्र त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे आढळून आल्याने पोलीसांनी त्याला अटक केली. यानंतर यादव याला रविवारी सूरजपूर कोर्टात हजर देखील करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी पोलीसांनी सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणात एल्विश यादव याच्यासह सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राहुल, टीटूनाथ, जय करण, नारायण आणि रविनाथ. या पाच जणांना अटक देखील करण्यात आली. या पाच जणांना झालेली अटक भाजप नेत्या मेनका गांधी यांच्या अॅनिमल वेलफेयर संस्था पीएफच्या तक्रारीनंतर करण्यात आली होती. यानंतर राहुल नावाच्या आरोपीने एल्विश यादव याच्याबद्दल मोठे खुलासे केले होते. त्यानंतर पोलीसांनी अनेक वेळा एल्विश यादव याची चौकशी देखील केली.
'या' अंतर्गत गुन्हा दाखल
नोयडा पोलीसांनी यादव विरोधात आयपीसी कलम २८४, २८९, १२०बी, आणि वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्ट १९७२ चे कलम ९, ३२, ४८, ४९. ५०, ५१ अंतर्गत गु्न्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आरोपींकडून सापडलेले सापांचे विष तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याबद्दलच्या रिपोर्टनंतर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलमे वाढवण्यात आली आहेत. मागील पाच महिन्यांत झालेल्या तपासात पोलीसांना अनेक गोष्टी आढळल्या आहेत.