शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याची माहिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी करत ही समेट घडवून आणल्याची समोर आलं आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. अजित पवार आणि शरद पवारांवर हल्लाबोल करत बारामतीत पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं. अशातच बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवास्थानी चर्चा केली. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या समेट घडवून आणण्यास देवेंद्र फडणवीसांना यश आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊ आपली भूमिका मांडणार असून ते बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय मागे घेऊ शकतात, अशी माहिती आहे.
विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती आहे. शिवतारे एक पाऊल मागे येण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा सुरू आहे. विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे.