अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी पहाटे गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असून अनेक सेलिब्रिटी व राजकीय नेत्यांनी अभिनेत्याची भेट घेतली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सिनेसृष्टीतही खळबळ उडाली आहे. अशातच गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या आई-वडिलांबरोबर राहतो. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान त्यांच्या वांद्रे येथील घरातून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा कोणताही विचार नाही. तो घर बदलणार नसून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहणार आहे.
अभिनेत्याच्या घरावर गोळ्या झाडल्याची जबाबदारी तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. त्याची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने हल्ल्याची जबाबदारी घेत हा फक्त ट्रेलर होता असं म्हटलंय.
मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही हल्लेखोरांचे फोटो सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले आहे. दोघेही दुचाकीवर बसून सलमानच्या घरासमोर आले होते, तिथे गोळ्या झाडून नंतर ते तिथून निघून गेले.