जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करून, मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे.
"लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की, त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा.",असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना विशेष आवाहन
"पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!", अशा शब्दांत मोदींनी पुढे तरुणांना आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना आपल्या ट्वीटमधून आवाहन केलं आहे.
पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यांमध्ये मतदान?
महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिजोरम, नागालॅंड, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडु, अंदमान निकोबार, जम्मू कश्मीर, लक्षद्वीप, पॉंडेचरी, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ५ जागांसाठी मतदान
राज्यात विदर्भातील ५ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.