जालना : सरकारला मराठ्यांची गरज नाही, त्यामुळे ते संपर्क ठेवत नाही. जातीजातीत भांडणं लावण्यासाठी भुजबळांच्या संपर्कात सरकार आहे. सरकारला मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ नाही. मराठ्यांचे प्रश्न सोडवायला मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे वेळ नाही. आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला सत्तेत जावं लागणार असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत फडणवीसांना प्रश्न विचारला.
ते म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास नकार आहे समजा, पण तुमची भूमिका काय?, मराठ्यांना आरक्षण द्यायचे की नाही हे सांगा. एकमेकांवर ढकलता कशाला, तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला होकार द्या, मराठे तुमच्या पाठिशी उभे राहतील. महायुती-मविआ कुणीतरी हा म्हणा, मराठ्यांना वेड्यात काढू नका असं त्यांनी सांगितले.
तेसच प्रसाद लाड मला मॅनेज करायला आलेत का? या लोकांनी दुकान सुरू केलेत. फोडाफोडीचं राजकारण करतायेत. आमदारकी देतो, मी बाजूला जातो ही गचाळ माणसं आहेत. मी राजकारणावर काही बोललो नाही. १० महिने माझा समाज आरक्षण मागतोय, आम्हाला राजकारणात जायचं नाही. १९ ऑगस्टला ११ महिने होतील. तुम्ही आरक्षण देत नसाल तर आम्हालाच सरकार बनवावं लागेल. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला पाडावं लागेल. सर्व गोरगरिब समाजातील लोकांना सत्तेत बसवावं लागेल.
आम्ही प्रामाणिकपणे आरक्षण मागतोय, तुम्ही देणार नसाल तर मराठ्यांवर अन्याय करत असाल तर आम्हाला सत्तेत जावं लागणार, राजकारण करावं लागणार. हे माझ्या समाजाचं म्हणणं आहे ते मी करतोय असंही जरांगेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, सत्ता स्थापन करेपर्यंत या लोकांना गरिबांची गरज लागते. सत्ता सोडू शकत नाही. मोदी शिर्डीला आले तेव्हाच आरक्षणावर लक्ष घाला बोललो होतो. आतमधून कपटाने भरलेली लोक आहेत. देशातील मोठ्या जाती भाजपाला संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल, यादव या सर्व जाती संपवायच्या आहेत. पण मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल हे त्यांना माहिती नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाला दिला.
..तर येवल्यात आंदोलन करू
ओबीसी आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. त्यामुळे तुम्ही विनाकारण आमच्यात पडण्याची गरज नाही. उगाच आपल्यातले संबंध बिघडवू नका. आम्ही त्यांना बोलत नाही याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करतो याचा अर्थ वेगळा काढू नका. छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. आमच्याकडे उपोषणाला बसवतो, रॅली काढायला लावतो. मग मी येवल्यात सुरू केले तर, मग कसं होईल. आम्हालाही महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा अधिकार आहे ना, आमच्याकडे काड्या लावायला लागला तर आम्ही येवल्यात, नाशिकमध्ये येऊन आंदोलन करण्याचा विचार आहे असं जरांगेंनी सांगितले आहे.