सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदल अधिकारी दाखल झाले होते. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी कोसळलेल्या पुतळ्याची आज पाहणी केली. याबाबत लवकरच एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार असून हा अहवाल नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नौदल दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे उभारण्यात यावा अशी भारतीय नौदलाची योजना होती. या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून किल्ल्याचे नुतनीकरण केले आणि त्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. हा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती.
पुतळा उभारण्याच्या कामात शासनाशी समन्वयक म्हणून लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय यांनी काम पाहिले होते. याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकोट कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. या पाहणीबाबत प्रसार माध्यमांपासून गुप्तता पाळण्यात आली होती.