नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहरात सार्वत्रिक गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून गर्दी होत असून, आता पुढील पाच दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात आहे. त्यामुळे शहरातील 11 प्रमुख मार्गांवरील प्रवेश दि. 16 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक मार्गांतील बदलांसंदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून, आज दि. 12 सप्टेंबरपासून सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत खाली दिलेले मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आलेले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्यवर्ती भागात गणेशोत्सवाचे देखावे व आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहनधारकांनी नियम पाळावेत; अन्यथा संबंधित वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली, तसेच सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहने व या परिसरात राहणार्या नागरिकांची वाहने यांना लागू राहणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
हे मार्ग बंद आहेत :-
- अण्णा भाऊ साठे पुतळा चौफुलीकडून कालीदास कलामंदिरमार्गे शालिमार चौकाकडे जाणारा रस्ता.
- सी. बी. एस. बाजूकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे अण्णा भाऊ साठे पुतळा चौक, सुमंगल कपड्याचे दुकान व सुमंगल कपड्याच्या दुकानाकडून कालीदास मार्गे जीपीओ, सीबीएस बाजूकडे येणार्या दोन्ही बाजूंचे रस्ते.
- सारडा सर्कल येथून खडकाळी सिग्नल ते शालिमार मार्गे - सीबीएसकडे येणारे दुतर्फा रस्ते.
- खडकाळी सिग्नल येथून दीपसन्स कॉर्नर, नेहरू गार्डनकडून गाडगे महाराज पुतळा मार्गे मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारे रस्ते.
- त्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंतचे सर्व मार्ग.
- गाडगे महाराज पुतळा - धुमाळ पॉईंट ते मंगेश मिठाई कॉर्नरपर्यंतचा रस्ता.
- सी. बी. एस. सिग्नलपासून शालिमारकडे व नेहरू गार्डनकडे ये-जा करणार्या सर्व वाहनांना प्रवेश बंद.
- मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल, धुमाळ पॉईंट, दहिपुलाकडील दोन्ही बाजूंचे रस्ते.
- प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणार्या सर्व वाहनांना प्रवेश बंद.
- अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डकडे जाणारे सर्व रस्ते.
- रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंटपर्यंतचा रस्ता हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
हे आहेत पर्यायी मार्ग :-
- खडकाळी सिग्नलकडून वाहनांना किटकॅट कॉर्नर, मोडक सिग्नल, सी. बी. एस. सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रामवाडी मार्गे मालेगाव स्टॅण्ड येथून इतरत्र जावे लागेल.
- खडकाळी सिग्नल, किटकॅट कॉर्नर, मोडक सिग्नल, सी. बी. एस. सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रामवाडी, मखमलाबाद नाका, पेठ नाका, दिंडोरी नाका मार्गे इतरत्र.
- सारडा सर्कल येथून खडकाळी सिग्नलकडे जाणारी वाहने ही गडकरी सिग्नल, मोडक सिग्नल, सी. बी. एस. सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रामवाडी, मखमलाबाद मार्गे इतरत्र जातील.
- मालेगाव स्टॅण्डपर्यंत येणारी वाहने मखमलाबाद नाका, रामवाडी मार्गे जुना गंगापूर नाका येथून इतरत्र जातील किंवा गर्दीची ठिकाणे सोडून इतर पर्यायी मार्गांचा वापर करतील.
अटॅचमेंट पहा