नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मोटारसायकलीला जबर धडक देऊन दुचाकीस्वारास लोखंडी पहारीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भारत कालीचरण कटारिया (रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांचा मुलगा करण कटारिया हा त्याच्या स्प्लेंडर मोटारसायकलीवरून समोसे घेऊन घरी येत होता. त्यावेळी काळेनगर येथील धनश्री बंगल्यासमोर आरोपी माजी नगरसेविका योगीता धनंजय आहेर, आश्लेष धनंजय आहेर व युवराज पवार यांनी करण कटारिया यांच्या मोटारसायकलीला जोरात धडक देऊन त्याला खाली पाडले.
त्यानंतर आरोपी योगीता आहेर, आश्लेष आहेर व युवराज पवार यांनी करणला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच लोखंडी पहारीने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात माजी नगरसेविकेसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.