नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) – काल मध्यरात्री जयभवानी रोड वरील फर्नांडीस वाडी येथे अचानक आग लागली, ज्यात एक भंगार दुकान आणि दोन घरं पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी,आगीमुळे सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटना फर्नांडीस वाडी येथे असलेल्या कुणाल सुरेंद्र लोहट यांच्या भंगार दुकानाला रात्री एक वाजेच्या सुमारास आग लागली. दुकानाला लागलेल्या आगीत लगेचच आसपासच्या दोन घरांना झळ लागली. यातील एक घर राहुल सतीश ढकोलीया आणि दुसरे घर राजेंद्र रामरतन बेहनवाल यांचे होते. आगीमुळे दोन्ही घरं पूर्णपणे जळून खाक झाली.
आगीच्या धुरामुळे संपूर्ण परिसरात धाकधूक पसरली आणि आरडा ओरड सुरु झाला. ढकोलीया आणि बेहनवाल कुटुंबातील सदस्य आपल्या घरांमध्ये झोपले असताना ही आपत्ती घडली, परंतु या आरडा-ओरडामुळे त्यांना वेळेत बाहेर पळता आले आणि त्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली.
घटना घडताच, स्थानिक रहिवाशी रितू डिंगम यांनी नाशिकरोड अग्निशमक दलाला त्वरित कळवले. तत्परतेने नाशिकरोड अग्निशमक दलाच्या पथकाने तीन बंब आणि नाशिक मुख्यालयाच्या एक बंबच्या मदतीने आग विझवण्यासाठी कठोर प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तास दीड तासाच्या अथक परिश्रमातून आग आटोक्यात आणली.
अद्याप आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही, परंतु या अपघातात भंगार दुकान व दोन्ही घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.
आगीचे नुकसान आणि नुकसानग्रस्त कुटुंबांची परिस्तिथी: या दुर्घटनेत जळलेल्या घरांमधून सर्व कुटुंबांनी कशा प्रकारे बाहेर पडून आपला जीव वाचवला हे पाहून परिसरातील नागरिकांनी या कुटुंबांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. मात्र, भंगार दुकान आणि घरांचे मोठे नुकसान लक्षात घेता, या कुटुंबांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते.
सदर घटनास्थळावरची तपासणी अद्याप सुरू असून, अधिक माहिती पोलीस निरीक्षक सपकाळे यांच्या चौकशीतून मिळू शकते.