नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक ही क्रांतीकारक, साहित्यिक, नाटककार यांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही नाशिकचे योगदान मोठे आहे. मात्र या शहराला बसलेला ड्रग्जचा विळखा, गुन्हेगारांची दहशत यामुळे शहराची
प्रतिमा डागाळली आहे.
नाशिकला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर मध्य विधानसभा मतदारसंघातून वसंत गिते यांच्यासारखे समाजाशी नाळ जुळलेले व सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व विधानसभेत पाठवा. त्यासाठी शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमुठ बांधा, असे आवाहन शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केले.
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ तुपसाखरे लॉन्स येथे झालेल्या संवाद मेळाव्यात खा. राऊत बोलत होते. आपल्या रोखठोक शैलीत बोलताना खा. राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांना धारेवर धरताना ड्रग्ज व भयमुक्त नाशिकसाठी वसंत गिते यांना विधानसभेत पाठवणे, ही शहरासाठी काळाची गरज असल्याचे सांगितले.
एकेकाळी थोर क्रांतीकारक, साहित्यिक, नाटककार, शेतकरी-कष्टकरी नेत्यांची भूमी असलेल्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नितांत प्रेम असलेले नाशिक आता एमडी ड्रग्जचा कारखाना व साठ्यामुळे बदनाम झाले आहे.
मात्र याच शहरातील शाळा, महाविद्यालयांना ड्रग्जचा विळखा बसला असून एमडी माफिया व पालकमंत्री यांच्यातील कनेक्शन तसेच गुजरातमधील कांडला बंदरातून होणारा पुरवठा यामुळे नाशिकची वाट लागल्याचा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केला. लोकसभा निवडणुकीत नाशिककरांनी खा. राजाभाऊ वाजे यांच्यासारखा निष्ठावान शिवसैनिक लोकसभेत पाठवला.
आता राज्यात शिवशाही आणायची असेल शहरातील चार आमदारांसह जिल्ह्यातूनही महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने विधानसभेत पाठवा, असे आवाहन खा. राऊत यांनी केले. शहरासाठी आपला वचननामा देणारा व ड्रग्जमुक्त नाशिकसाठी सजग असणारे वसंत गिते हेच विधानसभेत पोहचायला हवे, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.
अमेरिकेत कमला हँरीस हरल्या त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कमळाबाई हरणार असल्याचे सांगताना 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेची खिल्ली उडवताना .... २३ के बाद हटेंगे, असा नारा दिला. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांनी घडवला आहे. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे, यासारख्या घोषणांना थारा मिळणार नसल्याचे खा. राऊत यांनी नमूद केले.
यंदाची विधानसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवसेनेची स्थापना केली. मात्र मोदी, शाह यांनी 'चुना' आयोगाच्या मदतीने पक्ष व चिन्ह शिंदेंना बहाल केले. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिंदेंचा जन्म तरी झाला होता का, असा खरमरीत सवालही त्यांनी केला.
मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातील उमेदवार वसंत गिते यांनी आपल्या मनोगतात, 'भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक' ही संकल्पना भावल्याने नाशिककरांनी आपल्या उमेदवारीला स्वयंस्फुर्तीने पाठिंबा दिला असून त्यामुळे विजय निश्चित आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत सर्वांनी सजग रहाण्याचे आवाहन केले.
ड्रग्ज विरोधातील लढाईत शिवसेना (उबाठा) नेहमीच अग्रेसर असून याविरोधात शहरातील पहिला मोर्चा खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आल्याची आठवण करून दिली. ड्रग्ज प्रकरणाचा सुत्रधार 'चिपड्या' तुरुंगाबाहेर आला असून पंतप्रधानांच्या सभेत कोणाच्या मागे फिरत होता, असा खरमरीत सवाल उपस्थित करताना बंदोबस्तावरील पोलिसही त्याकडे हताशपणे पहात असल्याचा गंभीर आरोप केला.
याप्रसंगी खा. राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या 'एआयसीसी' चे प्रवक्ता शुभ्रांशु कुमार रॉय, शाहू (महाराज) खैरे, संजय चव्हाण, बबलू खैरे आदींची भाषणे झाली. प्रारंभी शिवसेना प्रदेश संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी महापौर विनायक पांडे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपिठावर शिवसेना उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे नाना महाले, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी महापौर यतीन वाघ, सिराज कोकणी, राहुल दिवे, समीर कांबळे, डॉ. सुचेता बच्छाव, प्रशांत दिवे, श्रमिक सेनेचे अजय बागुल, मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक, लक्ष्मण धोत्रे, डॉ. सुभाष देवरे, उल्हास सातभाई, संदीप शर्मा यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
"भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक" चा निर्धार !
शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मेळावा नाशिकमधील ड्रग्जचा विळखा व गुन्हेगारांची दहशत यामुळे गाजला. खा. संजय राऊत यांच्यासह सर्वच वक्त्यांनी छोटी भाभी-बडी भाभी, ड्रग्ज विक्रेत्यांना मिळणारा राजाश्रय, वाढती गुन्हेगारी, नामचिन गुन्हेगारांना मिळणारे पाठबळ व त्यांचा राजकारणात उजळ माथ्याने होणारा वापर यावर टीकास्त्र सोडले.
सर्वच शाळा व महाविद्यालयांना ड्रग्जचा विळखा पडला असून यामुळे नवीन पिढी नशेच्या चक्रव्युहात सापडली आहे. त्यामुळे 'भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक' साठी वसंत गिते यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रारंभी छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने पथनाट्य सादर केले. तसेच वासुदेव पथकानेही प्रबोधन केले.