नासिक - शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या एका सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावरती परिवाराने हल्ला केला त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे पळून जाणाऱ्या सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे. हा सर्व थरार रविवारी पहाटेची दीड वाजेच्या सुमारास घडला. यावेळी परिसरामध्ये गोळीबार झाल्याची चर्चा असून पोलिसांनी ती नाकारली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोड वरील अश्वमेघ नगर परिसरात सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे हा कट्टा बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा एकच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास किरण सोनवणे याच्या घरी जाऊन चौकशी करीत होते. यावेळी किरणचा भाऊ रवींद्र सोनवणे याने पोलिसांशी तुम्ही येथे कसे आले असे बोलून हुज्जत घालत आपल्या कुटुंबियांना जमा करून घेतले.
यावेळी जमलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर अचानक हल्ला केला. यावेळी पोलीस अंमलदार राकेश कोष्टी याला जखमी करून किरण सोनवणे याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलीस पाठलाग करीत असताना किरण याचा पाय अडकला आणि तो खाली पडला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तोल आणि पाचशे रुपये किमतीचे काडतूस जप्त केले.
पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी संशयित किरण छगन सोनवणे, ३८, रा. प्लॉट नंबर १३, अश्वमेघ नगर, पेठ रोड पंचवटी याच्यासह, अलका सोनवणे, रवींद्र सोनवणे, कुमार सोनवणे, सुनिता सोनवणे, वर्षा सोनवणे यांच्याविरोधात पोलीस नाईक मिलिंद परदेशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे