नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर ड्रग्ज संदर्भातील काही गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जाणून घेतल्यास यामागेही फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. फरांदे यांनी नाशिक ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिसांकडे केलेला पाठपुरावा, विधीमंडळाच्या सलग चार अधिवेशनांमध्ये अतिशय प्रखरतेने मांडलेली भूमिका यामुळे ड्रग्जमाफियांची पळता भुई थोडी झाली. त्या भितीपोटीच विरोधकांना हाताशी धरुन आता ‘फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न फरांदेंच्या बाबतीत होत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे, मुंबईनंतर नाशिकच ड्रग्जतस्करांचे माहेरघर बनू पाहत आहे. केवळ कॉलेजमधीलच नव्हे तर शाळकरी विद्यार्थीही ड्रग्जच्या आहारी जात आहे. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असलेल्या नाशिकची इतकी वाताहत होणे ही बाब सर्वसामान्य नाशिककरांना सहन होण्यासारखी नाही. या पार्श्वभूमीवर सलग चार अधिवेशनांमध्ये मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचं ठासून सांगितले.
त्या केवळ भाषणे करुन थांबल्या नाहीत तर त्यांनी ड्रग्ज पेडलर्सचे नाव, त्यांचे फोन नंबर्स, त्यासंदर्भातील पुरावे हे गृहखात्याचे अधिकार्यांना दिले. या प्रकरणाची गृहखात्याच्या माध्यमातून चौकशीदेखील करण्यास सांगितली. या विषयांवर सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे विरोधी गटातील काही नेत्यांचे पोटशूळ उठले. त्यांनी प्रा. फरांदे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करीत त्यांनी ड्रग्जविरोधात आवाज उठवणे बंद करावे यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी फरांदे यांची बदनामीही करण्यात आली. ही मंडळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर हाच एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याच्या इराद्याने प्रचार करीत आहे. इतकेच नाही तर, मुंबईतील काही नेत्यांकडूनही फरांदेंना टार्गेट करण्यात आले. यात सुषमा अंधारेंचेही नाव घेतले जाते.
त्यांच्या विरोधात कायद्याप्रमाणे हक्कभंगाचा प्रस्तावही फरांदे यांनी अधिवेशनात सादर केला होता. विरोधकांच्या षडयंत्रांना न घाबरता फरांदे यांचा लढा सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देत ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी लक्षात आणून दिले की, नाशिक शहर व परीसरात मोठ्या प्रमाणावर होणारा अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. तसेच बेकायदेशीर हुक्का पार्लरही चालविण्यात येत आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री होते. भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावसाठी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तसकरी होत असल्याचे समोर येते.
तसंच नाशिक शहरात हुक्का पार्लरदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देवयानी फरांदे यांनी केली. त्याचप्रमाणे जुगाराचे (बॉल गेम) यांसारखे अनैतिक खेळांचे अड्डे खुलेपणाने मुंबईनाका परिसरात सुरू आहे. या अनैतिक धंद्यांकडे पोलिस प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्याचे आमदार फरांदे सांगितले.
काही दिवसांपूर्वीच प्रा. फरांदे यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवणार्या एका समाजकंटका विरोधात भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. गजू घोडके नामक एकाने फेसबुकवर आ. फरांदेंच्या संदर्भात बदनामीकारक व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी भद्रकाली पोलीसांनी ही कारवाई केली. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नाशिक शहरात दाखल असलेल्या गुन्ह्यांची अभिलेखाची पडताळणी करण्यात आली आहे.
त्यानुसार नाशिक शहरातील मतदारसंघातील पक्षीय उमेदवारांचा अंमलीपदार्थांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आलेले नाही, असे दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांनीच स्पष्ट केल्याने आता अशा आरोपांना पूर्णविराम मिळाला आहे. या निमित्ताने आ. फरांदे यांच्यावर सातत्याने खोटे आरोप करणार्यांनाही चपराक बसली आहे. सोशल मिडीया किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये कोणत्याही गोष्टीची खात्री न करता चुकीची माहिती प्रसारीत करून अफवा पसरवू नये. याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी केले आहे.