नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): महाविकास आघाडीत देवळाली मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे. माजी आमदार योगेश घोलप यांनी या जागेसाठी एबी फॉर्म मिळविला आहे.
याआधी, लोकसभा निवडणुकीनंतर देवळालीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावा घेऊन आपला उमेदवार देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर देवळालीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षांचे इच्छुक उमेदवार होते.
पण, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवळाली मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून होते. आज झालेल्या चर्चेनंतर या जागेचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने लागला आणि योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली.
या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने नाशिक शहरातील तीन जागा आपल्या हाती घेतल्याने त्यांचा प्रभाव वाढला आहे. यापूर्वी शहरातील मध्य आणि पश्चिम या जागांवर वसंत गीते आणि सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी आधीच घोषित करण्यात आली होती. आता देवळालीमध्ये खरी राजकीय रंगत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.
बबनराव घोलप परतणार स्वगृही
आठ महिन्या पूर्वी शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शिंदे गटात गेलेले माजी मंत्री बबनराव घोलप स्वगृही जाणार आहेत.
रविवारी दुपारी साडे बारा वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री बबन घोलप पुन्हा ठाकरे गटात दाखल होतील.