सिडको :- सावकाराच्या जाचाला कंटाळून चहा व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
धीरज पवार असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. नांदुरी घाटाजवळील जंगलात १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. त्यातून हा उलगडा झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत धीरज पवार यांनी बेकायदेशीरपणे सावकारीचा धंदा करणाऱ्या वैभव देवरे याच्याकडून एप्रिल २०२३ मध्ये १२ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. सुरुवातीला व्यवस्थित हप्ते फेडले; मात्र नंतर काही आर्थिक अडचणींमुळे त्यांना हफ्ते भरणे शक्य झाले नाही. याचा गैरफायदा घेत वैभव देवरे आणि त्याच्या साथीदारांनी धीरज यांना धमक्या देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले.
व्याजाने घेतलेली रक्कम न दिल्यास कळवण तालुक्यातील वडीलोपार्जित जमीन लिहून देण्याचा दबाव देवरे टाकत होता.
आणि याच वैभव देवरे याच्या जाचाला कंटाळून धीरज पवार याने आत्महत्या केली असुन वैभव देवरे याच्याकडून होणा-या जाचाला कंटाळुन मी आत्महत्या करत असल्याचे मयत धीरज याने मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
दरम्यान याबाबत मयत धीरजची पत्नी गीतांजली धीरज पवार यांनी पतीच्या मृत्युनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. वैभव देवरे, त्याची पत्नी सोनल देवरे आणि त्यांचा साथीदार निखील पवार असे तक्रारीत नावे आहेत. दरम्यान, वैभव देवरे विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही बेकायदेशीर सावकारीचे गुन्हे दाखल आहेत.
वैभव देवरे सह तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. हे आरोपी ज्यांना पैशांची अडचण आहे, व्यवसायात ज्यांना आर्थिक नुकसान झाले आहे अशांना हेरून त्यांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी दामदुप्पट व्याज वसूल करतात. व्याजापोटी रक्कम दिली नाही तर शिवीगाळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करतात.
पवार यांचा डी एस पी बासुंदी चहा नावाने व्यवसाय असून त्यांनी देवरे कडून घेतलेल्या 12 लाख रुपयांच्या मोबदल्यात 32 लाख 40 हजार रुपये फेडूनही देवरे त्यांना धमकवायचा.