लासलगाव (शेखर देसाई) :- लासलगाव येथील चोथानी ट्रेडिंग कंपनीच्या लासलगाव-विंचूर रस्त्यावर असलेल्या बारदानाच्या गोदामास लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे बारदान जाळून खाक झाल्याची घटना आज संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे. यावेळी गोदामचे मालक जितेंद्र चोथानी यांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले त्यामुळे जीवित हानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की लासलगाव येथील विंचूर रोड वर जितेंद्र चोथानी यांचे मालकीचे बारदान चे गोदाम आहे. मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास या गोदामास भीषण आग लागल्यामुळे गोडाऊनमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाले. सदरची आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ मोठे लोळ उठत होते. या आगीमुळे गोदमा मध्ये ठेवलेले बारदान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.
मात्र आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही
आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्यास नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर या ठिकाणी येवला व पिंपळगाव बसवंत येथून अग्नीशामक च्या गाड्या दाखल झाल्या व आग आटोक्याट आणली.
दरम्यान या ठिकाणी पंकज भुजबळ यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितिची पाहणी केली.यावेळी नागरिकांनी भुजबळ यांच्याकडे लासलगाव साठी स्वतंत्र अग्नी शामक गाडीची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली.