नाशिकमध्ये दोन ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केले 31 लाख रुपये रोख
नाशिकमध्ये दोन ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केले 31 लाख रुपये रोख
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तपासणीदरम्यान दोन ठिकाणी मिळून पोलिसांनी सुमारे 31 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ही कारवाई परिमंडळ दोनमधील उपनगर आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाली असून, या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील विविध ठिकाणी पोलीस वाहनांची तपासणी करीत आहेत. ही तपासणी करीत असताना सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव बहुला येथे एस. एस. टी. पॉईंटवर पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाहनांची तपासणी करीत होते.

त्यांना एक बंद बॉडी असलेले वाहन क्रमांक एमएच 14 केए 5184 या वाहनामध्ये अवैधरीत्या ठेवलेली 20 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. या गाडीसोबत असलेला महेश शरद गिते याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्याला रकमेबाबत काही एक समाधानकारक अथवा त्या रकमेच्या मालकी हक्काबाबत सांगता आले नाही.

पोलिसांनी ही अवैधरीत्या मिळून आलेली रोख रक्कम जप्त केली असून, त्याबाबत एफ. एस. टी. पथकाचे प्रमुख अजय गवांदे यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

तसेच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिगारी कामगार असलेला ऋषिकेश माधव वानखेडे हा माणिकनगर, भालेराव मळा, जय भवानी रोड या ठिकाणी राहतो. त्याच्याकडे बेकायदेशीर व संशयास्पद रोख रक्कम व दागिने असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरील ठिकाणी त्यांनी छापा टाकला. घरामध्ये झडती घेतली असता घरी त्याच्या घरी 11 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली.

एखाद्या बिगारी माणसाकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, अशी शंका पोलिसांनी उपस्थित केली. त्याला त्या रकमेबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने ही रक्कम उपनगर पोलिसांनी जप्त केली आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group