परतीच्या पावसाने शेतकर्यांचे रब्बीचे नियोजन कोलमडले
लाल कांद्यास फटका उन्हाळचे रोप सडले मकाही संकटात
येवला :- गत तीन वर्षांपासून दुष्काळाने शेतकर्यांचे अर्थचक्र बिघडून टाकले होते यंदा चांगला पाऊस झाला तर पिके चांगली येऊन चार पैसे हातात येतील असे स्वप्न रंगवत असताना परतीच्या अवकाळी पावसाने येवला तालुक्यातील शेतकर्यांना कमालीचा झटका दिला आहे.
तालुक्यातील कातरणी,विखरणी, पाटोदा,आडगाव रेपाळ,सोमठाणे,कानडी,पारेगाव,चिचोंडी ,साताळी, भाटगाव धुळगाव, शिरसगाव लोकी, सुरेगाव सह जवळजवळ संपूर्ण तालुक्यात सर्वच ठिकाणी परतीच्या पावसाने दणका दिला आहे परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे
तीन वर्षांपासून हवा असलेला पाऊस यावर्षी मात्र नकोसा झाला आहे परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकर्यांच्या मका, कपाशी, सोयाबीन ही पिके संकटात आली आहेत शेतकर्यांनी सोयाबीन,मकाची सोंगणी,काढणी सुरू केली आहे काढून झालेल्या व शेतातच जमिनीवर पडलेल्या मका पिकाच्या बीटीस पावसामुळे मोड फुटण्याची शक्यता आहे . बरोबरच काढणीस आलेल्या कपाशी व सोयाबीन पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
राज्यातील कांदा उत्पादनाचे मुख्य आगार असलेल्या ह्या भागातील शेतकर्यांना यावर्षीच्या पावसाळ्यात अगदी उशिरापर्यंत चाललेल्या परतीच्या पावसाचा मोठा झटका बसला आहे. दोन ते तीन दिवसांपासून उशिरापर्यंत चाललेल्या परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे येवला तालुक्यातील शेतकर्यांचे खरीप हंगामातील मका, सोयाबीन व कापूस याचे संपूर्ण चक्र बिघडून गेले आहे शेतकर्यांनी लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा अन् पुढील रब्बी हंगामासाठी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे महासंकटात सापडली गेली आहेत.
तालुक्यातील शेतकर्यांनी आजवरच्या परंपरेप्रमाणे खरीप हंगामातील उशिराने लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा हा उशिरापर्यंत चाललेल्या परतीच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचून सडला आहे. तर दुसरीकडे शेतकर्यांनी खरीप नंतरच्या रब्बी हंगामासाठी गेल्या महिनाभरात टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे देखील शेतातील वाफ्यामध्ये पाणी साचल्याने सडू लागली आहेत. याबरोबरच सध्याच्या ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.कांदा पिकाला मोठया प्रमाणावर रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत आहे.
एका बाजूला कांदा हे पीक अडचणीत आले असतानाच द्राक्ष उत्पादक शेतकरीही सततच्या बदल्यात हवामानाने पुरता हबकून गेला आहे शेतकरी इतक्या मोठ्या संकटांत असतांना राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परतीच्या पावसामुळे यावर्षी कांदा उत्पादनात होणार घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतजमिनीतच सडू लागलेला लाल पोळ कांदा असो, की दुसरीकडे पुढील रब्बी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्यांनी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे अवकाळी पावसामुळे खराब झालेली आहे. त्यातून शेतकर्याने सध्या घेतलेल्या लाल पोळ कांद्याचे होणारे एकरी नुकसान, तसेच उन्हाळा कांद्यासाठीची रोपे कमी होऊन पुढील रब्बी हंगामात अपेक्षित असलेले उन्हाळा कांदा लागवडीखालील क्षेत्रात होणारी घट यामुळे कांद्याबाबतचे सर्वच गणित पुढील काळात बिघडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे यंदा कांदा उत्पादनात कमालीचा फटका बसणार आहे यंदाची दिवाळी बळीराजाला चांगली जाणार असे दिसत असतानाच निसर्गाच्या मनात वेगळाच विचार चालु होता ऐन सोंगणी अन दिवाळीच्या तोंडावर अवकाळी पावसाने जोर धरला आणी मका बाजरी कापुस कांदे द्राक्ष होत्याचे नव्हते केले. दरम्यान मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.