नाशिक (चंद्रशेखर गोसावी) - नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सायंकाळी जोरदार पाऊस पडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
चांदवड, देवळा, सटाणा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे टंचाई विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.
सध्या सुरू असलेल्या या बेमोसमी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील देवळा सटाणा, चांदवड, निफाड या भागासह काही परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. विशेष करून सटाणा आणि देवळा या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून या ठिकाणी पावसामुळे मोबाईलची रेंज ही मिळत नाहीये आणि वीजही गायब झाली आहे. शेतामध्ये उभे असलेले पीकही वाहून गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नाशिक शहरात देखील पाच वाजेपासून पाऊस सुरू आहे. काहीशी विश्रांती घेतल्यानंतर या बेमोसमी पावसाच्या सरी पडत असून त्यामुळे शहरातील गोविंदनगर, सिडको, त्रिमूर्ती चौक, पवन नगर, लेखा नगर, वावरे कॉलेज समोरील परिसर, पंचवटी, मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर, समर्थ नगर, जाणता राजा कॉलनी, या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.