सिडको - पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून एक बारा वर्षीय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी विजयनगर परिसरात घडली आहे.
मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मकर संक्रांत जवळ आल्यानंतर मागील काही दिवसापासून नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. पहिल्यांदा नायलॉन मांजामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. नायलॉन मांजामुळे आत्तापर्यंत किमान सात ते आठ जण जखमी झाल्याच्या घटना शहर आणि जिल्ह्यात घडलेल्या आहेत.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा लवकर सुटली म्हणून सिडकोतील विजय नगर परिसरात असलेल्या पंडित नगर या ठिकाणी शनी मंदिराच्या समोर राहणारा तनवीर असलम हा 12 वर्षीय मुलगा आपल्या घराच्या गच्ची वर पतंग उडवत होता. त्यावेळी तिथून हाय व्होल्टेज विद्युत तारांचा करंट लागल्यामुळे तो या वायरीला चिटकला.
ही घटना शेजारी असलेल्या सोनू नावाच्या नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने काठीच्या सहाय्याने मारून त्याला विद्युत तारांपासून दूर केलं. पण यादरम्यान तनवीरला डोक्याला आणि पायाला मोठ्या जखमा झाले आहेत. तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहे पण त्याची प्रकृती गंभीर आहे.