नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पाच चोरी झालेल्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या चोरीतील मोटरसायकल्सच्या मालकांना नाशिकरोड पोलिसांनी नवीन वर्षाची भेट दिल्याची चर्चा परिसरात आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी सांगितले की, नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई अजय देशमुख आणि नाना पानसरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, पवारवाडी आणि जेलरोड परिसरात एक संशयास्पद व्यक्ती दुचाकी वाहन घेऊन फिरत आहे.
त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय टेमगर, विशाल कुवर, समाधान वाजे आणि रोहित शिंदे यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी टाकळी गाव, आदिवासी वाडा येथील संदीप रावजी बर्डे (वय ३३) याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन आणि पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, आणि नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीपणे काम केले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सपोनि प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, अविनाश देवरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, अरुण गाडेकर, आणि योगेश रानडे यांनी पार पडली.