नाशिक :- दीड लाखाची लाच मागून तडजोडी अंती एक लाखाची लाच मागितल्या प्रकरणी दोन वायरमनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज वायरमन (पुर्ण नाव माहित नाही) गोटु वायरमन (पुर्ण नाव माहित नाही दोन्ही नेम. मराविवि कं. मर्या. जळगांव) अशी लाच मागणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे दि. 2/12/2024 रोजी भरारी पथकाने एकूण पाच विज मिटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे तुमच्यावर जर वीज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण 1,50,000/- रूपयांची लाच मागितली होती.
त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 3/12/2024 रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग जळगावकडे तक्रार दिली होती. दि. 3/12/2024 रोजी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी प्रमाणे लाच मागणी पडताळणी केली असता दोन्ही वायरमन यांनी एका विज मीटरचे 30 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1,50,000 रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,00,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे दोघां विरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोना. किशोर महाजन, बाळू मराठे, पोकॉ प्रदिप पोळ, अमोल सुर्यवंशी यांनी केली.