१३ डिसेम्बर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे.
येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत संरक्षण मंत्रालयाने बारा सुखोई-30 एमकेेआय विमानांसह संबंधित उपकरणे मिळविण्यासाठी करार केला आहे.
भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला चालना देणार्या हा करार आहे. या करारांतर्गत कर आणि शुल्कांसह सुमारे 13 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून काल त्यावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. या निर्णयाचे स्वागत नाशिक इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले आहे.
नाशिकमध्ये नुकतेच चार दिवस निमाच्यावतीने उद्योजकांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनातून अनेक माहिती आणि नवीन प्रकल्पांबाबत चर्चा देखील झाली. यामध्ये एचएएलने सहभाग नोंदवला होता. एचएएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांनी येथील एका चर्चासत्रामध्ये सहभागी होताना सांगितले होते की, नाशिकच्या एचएएलला केंद्र सरकारच्या वतीने लवकरच मोठे काम दिले जाणार आहे.
ही विमाने 62.6 टक्के देशी बनावटीची होणार असून भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्र त्यातील भागांचे उत्पादन करणार आहे. एचएएलच्या नाशिक विभागात या विमानांचे उत्पादन केले जाणार आहे. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षेमतेत भर पडणार असून, देशाची संरक्षण सज्जता आणखी बळकट होणार आहे.
Copyright ©2024 Bhramar