उद्या निघणार निवडणुकीची अधिसूचना, प्रशासनाची तयारी पूर्ण
उद्या निघणार निवडणुकीची अधिसूचना, प्रशासनाची तयारी पूर्ण
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :-  उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी भ्रमरशी बोलताना सांगितले की, निर्भय वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी मागील चार महिन्यापासूनच तयारीला लागलेले आहेत. काल भाजपाची पहिली यादी घोषित झाली आहे. आज आणि उद्या इतर राजकीय पक्षांच्या देखील पहिल्या याद्या घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची अधिसूचना उद्या निघणार असून ही अधिसूचना निघाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. 

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ तसेच 15 विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य जबाबदाऱ्या देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दैनिक भ्रमरला माहिती देताना सांगितले की, नाशिक जिल्ह्यात एकूण 15 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात 113- नांदगाव, 114- मालेगाव मध्य, 115- मालेगाव बाह्य, 116- बागलाण (अ. ज.), 117- कळवण (अ. ज.), 118- चांदवड, 119- येवला, 120- सिन्नर, 121- निफाड, 122- दिंडोरी (अ. ज.), 123-  नाशिक पूर्व, 124- नाशिक मध्य, 125- नाशिक पश्चिम, 126- देवळाली (अ. जा.), 127- इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात 25 लाख 99 हजार 839 पुरुष, 24 लाख 28 हजार 113 महिला, 120 तृतीयपंथी, 8 हजार 811 सैनिक मतदार असे एकूण 50 लाख 28 हजार 072 मतदार आहेत. 

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पुढे सांगितले की , जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निर्भय वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न व्हावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन केले , तसेच प्रशासनाची तयारी पूर्णत्वास गेलेली आहे. नागरिकांनी तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे जेणेकरून कोणावरही कटू कारवाई करण्याचा प्रसंग उद्भवणार नाही. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र दाखल करणे- मंगळवार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४, वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुट्टीचे  दिवस वगळता नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी- बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात, उमेदवारी अर्ज मागे घेणे- ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, मतदानाचा दिनांक व वेळ- २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल, तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ असा आहे.
 
जिल्ह्यात ४,९२६ मतदान केंद्रे

नाशिक जिल्ह्यात एकूण ४,९१९ मतदान केंद्र असून सात सहायकारी मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, एक शिपाई कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २७ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा एकूण ४० लाख रुपये असून उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर करावयाचा आहे. या खर्चासाठी उमेदवारांनी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे.

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडिओ सर्वेक्षण पथके, व्हीडिओ देखरेख पथके गठित करण्यात आली आहेत. फिरत्या पथकांना दंडाधिकारीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सोयीसुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येतील. ‘स्वीप’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ८५ वर्षांवरील मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा असेल. बीएलओंच्या माध्यमातून मतदार चिठ्ठी व मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जलज  शर्मा यांनी यावेळी  सांगितले.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group