नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने डी ए आर सी, पुणेवर ५ गडी राखून विजय विजय मिळवला.
नाशिकच्या रुद्र मेणेने सर्वाधिक ६५ धावा व एका डावात ३ व ४ असे सामन्यात एकूण ७ बळी या प्रभावी अष्टपैलू कामगिरीने विजयात मोठा वाटा उचलला.
महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दोन दिवसीय कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी केलेल्या डी ए आर सी, पुणेने पहिल्या डावात १११ धावा केल्या. प्रणव पाटीलने ४ व रुद्र मेणेने ३ बळी घेतले. उत्तरादाखल नाशिकने रुद्र मेणेच्या सर्वाधिक ६५ व विघ्नेश सानपच्या ५० धावांच्या जोरावर १९१ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात रुद्र मेणेने ४ बळी घेत डी ए आर सी ला १५८ धावांत रोखले.
विजयासाठी दुसऱ्या डावात ५ बाद ७९ धावा करत नाशिकने विजय मिळवला, त्यात मुजतबा सय्यदने नाबाद ३५ धावा केल्या.
नाशिक मधील दुसऱ्या सामन्यात मेरी १ क्रिकेट मैदानावर, जेट ७ स्पोर्ट्स पुणेने अथर्व बोडखेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पूर्व विभागावर १ डाव व १९२ धावांनी मोठा विजय मिळवला. अथर्व बोडखेने नाबाद ११९ धावा व सामन्यात एकूण ८ बळी अशी जोरदार कामगिरी केली.