२१ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विधान परिषदेच्या एका माजी सदस्याने राष्ट्रीय चिन्ह वापरून समाजमाध्यमात प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंबादास जगन्नाथ खैरे (वय 43, रा. विजयनगर कॉलनी, औरंगाबाद नाका, पंचवटी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी नरेंद्र भिकाजी दराडे यांनी ते विधान परिषद सदस्य नसताना तोतयेगिरी करून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्य असल्याचे भासविले, तसे राष्ट्रीय चिन्ह वापरण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना ते चिन्ह वापरून सार्वजनिक बांधकाम पूर्व नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांशी पत्रव्यवहार केला व ते पत्र समाजमाध्यमात प्रसिद्ध करून दिशाभूल केली.
हा प्रकार 11 ते 20 सप्टेंबर या कालावधीत घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित नरेंद्र दराडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar