नाशिकरोड लोहमार्ग व सुरक्षा बलाची  धडाकेबाज कामगिरी: 32 लाखांचे सोने चोरी करणारा आरोपी अटक
नाशिकरोड लोहमार्ग व सुरक्षा बलाची धडाकेबाज कामगिरी: 32 लाखांचे सोने चोरी करणारा आरोपी अटक
img
Chandrakant Barve
 नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड जीआरपीचे व आर पी एफ पोलीस कर्मचारी यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करत 32 लाख रुपयांचे सोने चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई नाशिक रेल्वे स्टेशनवर करण्यात आली, ज्यात आरोपी पश्चिम बंगालला हावडा एक्स्प्रेसमधून पळून जात असताना पकडण्यात आला.

पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक १८२/२४ अंतर्गत बीएनएस 306 आणि 3 (5) या कलमांखाली दाखल केलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित पाल (वय 21 वर्षे, रा. पश्चिम बंगाल) याने मुंबईतून 32 लाख रुपयांचे सोने चोरी करून पश्चिम बंगालला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनचे पीएसआय शिंदे यांनी नाशिकरोड आर पी एफ व जीआरपीला माहिती दिली होती.

प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आर पी एफ निरीक्षक हरफूल सिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळू आव्हाड,आरपीएफचे पीएसआय दिनेश यादव, मनीष कुमार सिंग आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पीएसआय अजित शिंदे यांच्या मदतीने हावडा एक्स्प्रेसमध्ये आरोपीचा शोध घेतला. आरोपी अमित पालला नाशिक रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिकरोड जीआरपीचे पोलीस  व आर पी एफ अधिकारी, कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या वेगवान आणि प्रभावी कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात सोने चोरीचे प्रकरण उघडकीस आले असून, आरोपीला अटक करण्यास यश मिळाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group