नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विवाहितेचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती दाखवून विवाहितेवर चुलतदिरासह चुलत सासऱ्याने तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला ही देवळाली कॅम्प परिसरात राहते. फिर्यादीची आरोपी चुलतसासू हिने पीडित महिला ही एके दिवशी आंघोळ करीत असताना तिचे नग्नावस्थेतील फोटो तिच्या नकळत काढले होते.
हे फोटो आरोपी चुलतदीर याने पीडितेचा पती व नातेवाईकांना पाठविण्याची भीती दाखवून, तसेच व्हॉट्सॲप व इतर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्या राहत्या घरी लैंगिक अत्याचार केले, तसेच पीडितेचे चुलतसासरा यांनीसुद्धा चुलतसासूच्या मदतीने मुक्तिधाम येथील एका लॉजवर बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केला.
यावेळी लॉजमध्ये काढलेले विवाहितेचे अश्लील फोटो तिच्या सासूला व पतीला दाखवून संगनमत करून चुलतदीर, चुलतसासरा व चुलतसासू यांनी संगनमत करून पीडितेची बदनामी केली. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एक महिला व दोन पुरुषांसह लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.