अटल सेतूचं उद्घाटन 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलं असून तो मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून उडी मारत पुण्याच्या बँकरने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, आता अटल सेतूवरुन पुन्हा एकदा एका व्यक्तीनं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अटल सेतूवरून ४० वर्षांच्या व्यक्तीने समुद्रामध्ये उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अटल सेतूवर कार पार्क करून या व्यक्तीने समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस या कारच्या मदतीने ही व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा शोध घेत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अटल सेतू ८.५ किमी येथे एका व्यक्तीने समुद्रामध्ये उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीने अटल सेतूवर आपली कार उभी करून समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलस निरीक्षक, ठाणे अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उडी मारलेल्या व्यक्तीची लाल रंगाची कार उभी आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता ही घटना सकाळी ९.५७ च्या सुमारास घडल्याचे दिसून आले. घटनास्थळी रेस्क्यू टीम आली असून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित माहिती देण्यात येणार आहे.