नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मालकाला लुटण्याची सुपारी देणार्या ऑफिसबॉयसह पाच जणांच्या टोळीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने जेरबंद केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून, तीन जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ व्यावसायिक शारीक शेख, दीपक खताळे व ऑफिसबॉय जयेश चंद्रकुमार वाघ (रा. गंगापूर रोड, नाशिक) हे त्यांच्या महिंद्रा कारने दिवसभरात झालेल्या व्यवसायातील दोन लाख रुपये घेऊन त्यांच्या ऑफिसजवळ आले. कारमधून खाली उतरलेल्या शारीक शेख व दीपक खताळे यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला करून त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर शेख व खताळे हे बिल्डिंगच्या दिशेने पळाले. त्यानंतर हल्लेखोरांचा डाव फसला व ते तेथून मोटारसायकलीने पसार झाले. या गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे व पोलीस निरीक्षक जागवेंद्रसिंग राजपूत यांच्या सूचनेप्रमाणे गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पथकाने समांतर तपास केला.
तेथील सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करीत आरोपी उदय राजेंद्र घाडगे (रा. मोनाली अपार्टमेंट, त्र्यंबक रोड, नाशिक), संकेत मंडलिक (रा. मशीद चौक, कोपरगाव, जि. अहमदनगर), रोहित किशोर लोहिया (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), विराज कैलास कानडे (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), जयेश चंद्रकुमार वाघ (रा. गंगापूर रोड) यांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण विधिसंघर्षित बालक आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सरकारवाडा विभागाचे नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे, पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, गिरीश मटाले, गणेश रेहरे, सचिन काळे, मच्छिंद्र वाघचौरे, गोरख साळुंके, सुजित जाधव, सोनू खाडे, भागवत थवल व शिवम् सावळे यांनी केली.