नाशिक :- 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजारांची लाच घेताना दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सुमंत सुरेश पुराणिक (वय 40), न्याय लिपीक (निरीक्षक), वर्ग-३, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, द्वारका नाशिक, (रा. श्री निधी बंगला, डी जी पी नगर-1, रेयॅान स्कुल जवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक) व संदीप मधुकर बावीस्कर (वय ४७) लघुलेखक, वर्ग-२ (अराजपत्रीत) धर्म दाय उप-आयुक्त, नाशिक (रा. एन ४२, जे.सी. २/२/५ रायगड चौक, सिडको नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचेकडे नविन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणुक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविले बद्दल व येणा-या पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता सदर कामकाज जलद गतीने करुन देणेचे मोबदल्यात सुमंत सुरेश पुराणिक यांनी दि. 23/09/2024 रोजी लाच पडताळणी कारवाई दरम्यान प्रथम 20,000/- रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांचेकडे मागणी केली. तडजोडी अंती 15000 रुपये लाचेची मागणी केली. सदर लाच मागणीस बाविस्कर यांनी प्रोत्साहन दिले. सदरची लाच रक्कम आज दि. 01/10/2024 रोजी सुमंत पुराणिक यांनी त्यांचे कार्यालयात स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चैधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे यांनी केली.