रक्षकच बनले भक्षक! विद्यार्थिनीचा पोलिसांकडून विनयभंग ; कुठे घडली  घटना
रक्षकच बनले भक्षक! विद्यार्थिनीचा पोलिसांकडून विनयभंग ; कुठे घडली घटना
img
Dipali Ghadwaje
गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी मद्यपान करुन देवगडमध्ये कॉलेजला जाणाऱ्या तरुणीची छेड काढल्याने महिलांचे संरक्षण करणारे पोलिसच भक्षक ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईतील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला. 

दरम्यान तरुणीची छेड काढणाऱ्या पोलिसांना स्थानिक नागरिकांनी चांगला चोप दिला. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका १८ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा विनयभंग आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन वसई वाहतूक पोलिस , एक सीआयएसएफ जवान, राज्य राखीव पोलिस दलाचा एक कर्मचारी आणि दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीची त्यांनी छेड काढली होती. मद्यधुंद अवस्थेत आणि गणवेशात नसलेले हे सहा जण सुट्टी घेऊन वसईहून गोव्याला फिरायला जात होते. 

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास देवगड तालुक्यातील जामसांडे गावातील आनंदवाडी वळणावर एक १८ वर्षीय तरुणी कॉलेजवरून घरी जात असताना तिला पोलिस शिपाई हरिराम गीते याने एकटी पाहून छेड काढली ‘माझ्या सोबत येते का.? तुला वसई फिरवतो असे सांगितले. तर अन्य पोलिसांनी टिंगलटवाळी केली. ती तिथून निघून जात असताना त्यांनी अश्लील शेरेबाजी केली.

त्यानंतर हे पोलिस कारमधून खाली उतरले आणि तिला खेचून कारच्या दिशेने घेऊन येत होते. त्यावेळी पीडित तरुणीने आरडाओरडा केला. तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या पोलिसांना पकडले आणि चांगली मारहाण केली.

नेमक काय घडले? 

मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाने वसईतील वाहतूक हवालदार हरिराम गीते (३४ वर्षे) आणि प्रवीण रानडे (३३ वर्षे) यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि पोलिस दलाची सार्वजनिक प्रतिमा मलिन केल्याबद्दल गुरुवारी निलंबित केले. हरिराम, प्रवीण, माधव केंद्रे (३२ वर्षे), श्याम गीते (३२ वर्षे), सत्व केंद्रे (३२ वर्षे), आणि शंकर गीते (३३ वर्षे) यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. 

अटक करण्यात आलेले पाच जण नांदेड जिल्ह्यातील, तर एक ठाण्यातील बदलापूर येथील आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हरिरामने जामसंडे गावातील राज्य परिवहन बस डेपोजवळ आरोपींनी कार थांबवली आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ नेली. तरुणीने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. तरीही हरिराम तिच्या मागे कार घेऊन गेला आणि तिला आमच्यासोबत वसईला चल असे म्हणाला. त्याचसोबत त्याने अश्लील शेरेबाजी केली. कारमध्ये बसलेले इतर पाच जण बाहेर आले. त्यांनी तिचा हात थरला आणि खेचून कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांकडे मदत मागितली. तेव्हा या नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप दिला.

आरोपींनी स्थानिक नागरिकांची माफी मागितली. संतप्त नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यापूर्वी त्यांना रस्त्यावर बसवले. तिथे हरीराम आणि प्रवीण यांनी स्वतःची ओळख वसईचे वाहतूक पोलिस म्हणून दिली, एकाने तो सीआयएसएफ जवान असल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने तो एसआरपीएफ जवान असल्याचे सांगितले आणि बाकीचे दोघांनी स्वतःला सरकारी कर्मचारी असल्याचे सांगितले. या सर्व सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना कोर्टामध्ये हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group