नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीशी लग्न करून तिच्या आईवडिलांकडून पैसे आणले नाहीत म्हणून तिचे फोटो व्हायरल करून समाजात बदनामी केल्याप्रकरणी बँकेच्या सेल्स मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी (वय 26) ही निफाडची रहिवासी असून, ही तरुणी डिसेंबर 2022 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत शरणपूर रोडवरील इंडसइन बँकेच्या शरणपूर शाखेत नोकरी करीत होती. त्यावेळी त्यांच्या बँकेशेजारी असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या शरणपूर रोड शाखेत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करणार्या आरोपी जयदीप सीताराम सूर्यवंशी (पत्ता माहीत नाही) याने पीडितेशी ओळख निर्माण करून प्रेम असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेत फिर्यादीचे खाते उघडण्याचा बहाणा करून फिर्यादीचा ई-मेल आयडी आरोपी जयदीप सूर्यवंशी याने हॅक केला, तसेच फिर्यादी तरुणीच्या ई-मेल आयडीचा अॅक्सेस त्याच्या मेलवर घेतला, तसेच फिर्यादीला चांगली नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादीला भुलवून व दमदाटी करून तिच्यासोबत लग्न करून घेतले. त्यानंतर तरुणीला तिच्या आईवडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करू लागला.
तरुणीने पैसे आणण्यास नकार दिला असता आरोपी सूर्यवंशी याने तिच्या नावाने इन्स्टाग्राम खाते ओपन करून त्या खात्यावर तरुणीच्या संमतीशिवाय तिचे फोटो एडिट करून टाकले व तिची समाजामध्ये बदनामी केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी सेल्स मॅनेजर जयदीप सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.