नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : चोपडा येथील मनू देवीच्या दर्शनाला जात असताना उपनगर येथील तिघांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यु झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये दोघ्या सख्खा भावांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यत होत आहे.
सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव सुरु आहे. विविध ठिकाणी देवीच्या दर्शनाची लगबग सुरु आहे.उपनगर मातोश्री नगर येथील श्रीरत्न मेडिकलचे संचालक शैलेश श्रीधर राणे (वय 40) , निलेश श्रीधर राणे (वय 42) हे बंधू व इच्छामणी किराणा दुकानाचे संचालक जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय 45) त्याचा एक मित्र असे राणे बंधूची कुलदैवत असलेल्या चोपडा येथील मनू देवीच्या दर्शनाला सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मारुती रिट्ज कारने उपनगर येथून रवाना झाले.
पहाटे चोपडा नजीक जाताच कारचे टायर फुटले व गाडीने पलटी घेत समोरून चोपडा-नाशिक या परिवहन विभागाच्या बसला समोरून धडक दिली. त्यात राणे बंधू व भोकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
राणे बंधू यांचे मूळ गाव चोपडा जवळील निजामपूर असून तिथे आई, वडील व एक भाऊ राहतो. तर भोकरे हे उपनगर भागात आपल्या कुटूंबियसोबत राहत होते. ऐन सण उत्सवाच्या काळात या अपघातात उपनगर येथील दोन भावांचा व त्यांच्या मित्राचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यत होत आहे.