मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर तुळजाभवानीच्या मंदिरातूनच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
तुळजाभवानीच्या मंदिरातूनच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. या पुढचं आंदोलन हे मुंबई येथील आझाद मैदानावर होऊ शकतं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकार कुणाचंही असलं तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुफडा साफ केला असता, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुफडा साफ केला असता. यापुढे आरक्षणासाठी आझाद मैदानावर सामूहिक उपोषण होऊ शकतं. आरक्षणाची चळवळ थांबवणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करण्याची शक्यात आहे.