धक्कादायक ! ती लिफ्ट मागून गाडीवर बसली अन, अपघातात ठार झाली,  कुठे घडली घटना
धक्कादायक ! ती लिफ्ट मागून गाडीवर बसली अन, अपघातात ठार झाली, कुठे घडली घटना
img
दैनिक भ्रमर
वाहनाच्या अपघातात अनेक लोक दगावतात पण एका महिले सोबत जी घटना घडली ती मन हेलावणारी आहे. एक दुचाकीच्या अपघातात या महिलेचा मृत्यू झाला असून लिफ्ट मागून ती या दुचाकीवर बसली होती. साताऱ्यातील कराडमधून ही  धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार झाली आहे तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. जखमीला व्यक्तीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका अमोल जाधव (वय-31, रा. संजयनगर, मसूर ता. कराड) असx अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. तर मनोहर आनंदा नायकवडी असं अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मनोहर नायकवडी हे आपल्या स्प्लेडर दुचाकी (क्रमांक एम एच १० सी जी १६९५) वरून चाफळकडे गेले होते. काम आटपून ते परत घरी वाळवा इथं जात होतं. पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तासावडे टोल नाक्यावर पोहोचले. त्यावेळी प्रियांका जाधव यांनी “माझी गाडी चुकली आहे, मला कराडमध्ये सोडा अर्जंट काम आहे” असं सांगून लिफ्ट मागितली. माणुसकी म्हणून नायकवडी यांनी या महिलेला मदत केली. दोघेही दुचाकीवरून  कराडकडे येत होते. महामार्गावर येथील पंकज हॉटेल समोर आले असता, पाठीमागून आलेल्या भरधाव  वाहनानं दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले. तर प्रियांका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.

दरम्यान, अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र धडक देणारे वाहन अपघातस्थळावरून पसार झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group