धक्कादायक ! युट्युबवर पाहून डाएट  ,  १८ वर्षीय तरुणीचा‘ॲनोरेक्सिया’ने मृत्यू
धक्कादायक ! युट्युबवर पाहून डाएट , १८ वर्षीय तरुणीचा‘ॲनोरेक्सिया’ने मृत्यू
img
दैनिक भ्रमर
आजकाल शरीराने बारीक दिसणे म्हणजे आकर्षक  बांधा असा समज निर्माण झाला असून. विशेषतः कॉलेजच्या तरुणींमध्ये बारीक दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान तरुणीचा असाच एक पर्यटन तिचा जीवावर बेतला आहे. 


 केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कूथुपरंबा येथे राहणाऱ्या १८ वर्षीय श्रीनंदा या तरुणीचा ‘ॲनोरेक्सिया’ या आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वजन कमी करण्यासाठी तिने युट्युबवर पाहून डाएट करण्याचा प्रयत्न केला होता आणि मागील काही महिन्यांपासून ती केवळ पाण्यावरच जगत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘ॲनोरेक्सिया’ हा एक मानसिक आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीला आपल्या वजनाची आणि आहाराची खूप जास्त काळजी वाटते. या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती शारीरिकदृष्ट्या बारीक असूनही स्वतःला ‘जाड’ समजते आणि अन्न टाळते. श्रीनंदा गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून या आजाराने ग्रस्त होती, असे तिच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून श्रीनंदाने जवळजवळ काहीच खाल्ले नव्हते आणि हे तिने कुटुंबापासून लपवून ठेवले होते. सुमारे पाच महिन्यांपूर्वी तिला रुग्णालयात नेण्यात आले होते, तेव्हा डॉक्टरांनी तिला नियमित खाण्याचा सल्ला दिला आणि कुटुंबाला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, श्रीनंदा तिच्या पालकांनी दिलेले अन्न खात नसे आणि बऱ्याच काळापासून ती केवळ गरम पाण्यावरच जगत होती. कुटुंबीयांनी तिला कोझिकोड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे तिच्या चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी कुटुंबाला तिला योग्य आहार देण्याचा आणि मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला.

दोन आठवड्यांपूर्वी तिची रक्तातील साखर कमी झाली, तसेच तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तात्काळ थलासरी को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सल्लागार चिकित्सक डॉ. नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितले की, तिला सुमारे १२ दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आले आणि थेट अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. ती रुग्णालयात आली तेव्हा तिचे वजन केवळ २४ किलो होते आणि ती पूर्णपणे अंथरुणाला खिळलेली होती.तिची साखर, सोडियम, रक्तदाब कमी होता. ती व्हेंटिलेटरवर होती. पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.

श्रीनंदाच्या मृत्यूनंतर आरोग्य तज्ज्ञांनी धोकादायक डाएट ट्रेंड आणि यूट्यूबवरील चुकीच्या माहितीबाबत लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा असे चुकीचे प्रयोग जीवावरही बेतू शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group