भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांत नेमकं काय-काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचं ठरवलं आहे. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजी एअर ऑपरेशन्स ए.के. भारती, डीजी नेव्ही ऑपरेशन्स व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याबद्दल प्रत्येक तपशील दिला. पत्रकार परिषदेत लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालकांनी भारताने केलेल्या कारवाईत १०० दहशतवादी आणि पाकिस्तान लष्कराचे ४० जवान ठार झाल्याचे सांगितले.
दरम्यान , भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनावर कठोर भूमिका घेतली असून, याबाबत अधिकृत इशारा दिला आहे. लष्कराने सांगितले की, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार नाही. आज रात्री पुढे काय घडतंय ते पाहू. पण कुठलेही पुढील उल्लंघन झाल्यास आमचं उत्तर अत्यंत तीव्र असेल, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.
भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. “आज मी पाकिस्तानच्या माझ्या समकक्ष अधिकाऱ्याला संदेश दिला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे होत असलेल्या उल्लंघनाबाबत आम्ही त्यांचे लक्ष वेधले आहे. 10 मे रोजी झालेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याचेही आम्ही त्यांना सांगितले,” अशी माहिती राजीव घई यांनी दिली.
तसेच, लष्कराच्या प्रमुखांनी (चिफ ऑफ आर्मी स्टाफ) आज एक आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत सुरक्षेचा आढवा घेण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे कोणत्याही पद्धतीने उल्लंघन झाल्यास लष्कर प्रमुखांनी कमांडर्सना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सूट दिलेली आहे, असेही राजीव घई यांनी सांगितले.
दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी राजीव घई शेवटी पाकिस्तानसोबतच्या तणावात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रती तसेच शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांचा त्याग हा कायम लक्षात ठेवला जाईल. भारताच्या अखंडतेला, नागरिकांना धोका पोहोचवला जात असेल तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असेही राजीव घई यांनी सांगितले.