नाशिक (प्रतिनिधी) :- क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगकडून जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून एका तरुणास 43 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मिलिंद तीर्थराज पाटील (वय 32, रा. त्रिमूर्तीनगर, जेलरोड, नाशिकरोड) हा ट्रेडिंगचे काम करतो. त्यादरम्यान दि. 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात व्हॉट्सॲपधारक इसमाने त्याच्याशी संपर्क साधला, तसेच त्याला व्हॉट्सॲप लिंकवर क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगकडून जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखविले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी पाटील याने अज्ञात इसमाने दिलेल्या टेलिग्राम आयडी, यूपीआय व आयसीआयसीआय बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांवर इंटरनेट व मोबाईल फोनद्वारे 43 लाख 22 हजार 950 रुपये जमा करण्यास सांगितले; मात्र अज्ञात इसमाने सांगितल्याप्रमाणे परतावा न देता, तसेच पाटील यांनी भरलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.