नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ग्राहकांना फ्लिपकार्ट कंपनीतर्फे ऑनलाईन ऑर्डर दिलेले मोबाईल व घड्याळे असे सुमारे दहा लाखांचे साहित्य दोन डिलिव्हरी बॉयने ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या गोडाऊनमधून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मयूर भीमराव शिंदे (रा. दत्तवाडी, आकुर्डी, पुणे) हे इन्टेक्स ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत सिनिअर लिगल अधिकारी म्हणून काम करतात. ते कंपनीच्या पुणे येथील हेड ऑफिसमध्ये काम पाहतात. इन्टेक्स ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीचे अंबड येथे स्वामी विवेकानंदनगरमध्ये डी-7 व 8 जय प्लाझा या प्लॉटवर गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये आरोपी चेतन कृष्ण शिंदे (वय 27, रा. मु. पो. सामोडे, जि. धुळे) हा तीन वर्षांपासून व आरोपी हर्ष एकनाथ तळेकर (वय 23, रा. वज्रेश्वरीनगर, जेलरोड, नाशिक) हे तीन महिन्यांपासून कंपनीमध्ये काम करतात.
दरम्यान, दि. 12 नोव्हेंबर रोजी कंपनीचे एरिया मॅनेजर यज्ञदत्त रामसिंग शर्मा यांनी फिर्यादी मयूर शिंदे यांना कंपनीच्या गोडाऊनमध्ये नाशिक येथील ग्राहकांना फ्लिपकार्ट कंपनीतर्फे ऑनलाईन ऑर्डर दिलेले व डिलिव्हरी करण्यासाठी ठेवलेले महागडे मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व मोबाईलच्या पॉवरबँक या वस्तू चोरीला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी शिंदे हे नाशिक येथे येऊन त्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेले साहित्य तपासले. त्यात सॅमसंग, ॲपल, रिअलमी, मोटोरोला, ई-फिनिक्स, विवो वन प्लस, ओप्पो, रेडमी मोबाईल, मोबाईल पॉवर बँक व स्मार्ट वॉच अशा वस्तू दिसून आल्या नाहीत.
त्यांनी कंपनीच्या गोडाऊनमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये डिलिव्हरी बॉय चेतन शिंदे व हर्ष तळेकर हे दोघे जण दि. 23 व 25 नोव्हेंबर रोजी गोडाऊनमधील 7 लाख 57 हजार रुपये किमतीचे मोबाईल, 8 हजार 331 रुपये किमतीचे नाईस कंपनीचे स्मार्ट वॉच, 7 हजार 523 रुपये किमतीचे आयर बोट कंपनीचे स्मार्ट वॉच, 8 हजार 823 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉवरबँक असे 9 लाख 63 हजार 843 रुपये किमतीचे साहित्य या दोघांनी चोरून नेले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघा डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.