नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की सुमन अब्दुल खान (रा. सटाणा, जि. नाशिक) हिची दि. 29 डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली होती. बाळाला व महिलेला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. एक अनोळखी महिला दोन दिवसांपासून तिच्या पतीसमवेत बोलत होती.
आपली ओळख असल्याचे भासवून ती बाळाला खेळवायची. आज ही महिला पुन्हा सुमन खान हिच्याजवळ आली होती. बाळाला वडिलांकडे घेऊन जाते, असे सांगत ती बाळाला घेऊन गेली; मात्र वडिलांकडे बाळाला न देता ती निघून गेली. ही घटना लक्षात येताच खान यांनी पोलिसांना याबाबत कळविले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेत अधिक माहिती घेतली.
सुमन खान यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.