मयत खातेदाराच्या वारसांची २ कोटी १२ लाखांची फसवणूक
मयत खातेदाराच्या वारसांची २ कोटी १२ लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बनावट कागदपत्रांच्या आधारे विमाधारक बँक खातेधारकांचे १०६ तोतये वारसदार दाखवून खर्‍या वारसांच्या २ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लतिका मधुकर कुंभारे (रा. तिरुमला लक्झरिया, सिरीन मेडोज्, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की जुलै २०२२ पासून ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेत हॉल इनचार्ज म्हणून काम करणारा आरोपी दीपक मोतीलाल कोळी (वय ४०, रा. भारद्वाज रेसिडेन्सी, भुजबळ फार्मजवळ, नाशिक) याने त्याच्यावर विश्वासाने सोपविण्यात आलेल्या पदाचा दुरुपयोग केला.

या पदाच्या माध्यमातून आरोपी कोळी याने बनावट कागदपत्रांच्या आधारे विमाधारक बँक खातेदारांचे १०६ तोतये वारसदार दाखविले. त्यानंतर या खातेधारकांच्या नावे बँकेमध्ये वेगळे खाते उघडून पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेतील दाव्याची रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तोतये वारसदारांच्या खात्यांवर प्राप्त करून घेत एकूण २ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केला, तसेच तोतये वारसदार उभे करून आरोपी कोळी याने पंजाब नॅशनल बँकेची, एलआयसीची, तसेच मयत खातेदारांच्या खर्‍या वारसदारांचीही आर्थिक फसवणूक करून रकमेचा अपहार केला आहे.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी दीपक कोळीविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group