नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सदोष मनुष्यवधाला कारणीभूत ठरणार्या नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून 24 जणांकडून नायलॉन मांजा जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतील पथकांनी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रेत्यांकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या भागांत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये एकूण 24 दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कबजात बाळगून नायलॉन मांजाचा साठा करणार्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे.
त्याअंतर्गत शहर पोलिसांनी पंचवटी परिसरात 1, म्हसरूळला 2, आडगावला 1, भद्रकाली परिसरात 2, सरकारवाडा परिसरात 1, मुंबई नाका येथे 3, अंबड परिसरात सर्वाधिक 9, उपनगरला 1, तर देवळाली कॅम्प हद्दीत 4 अशा एकूण 24 ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकून संबंधितांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.