आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये गुरुवारी एका शाळेबाहेर चाकू हल्ला झाला होता. यामध्ये तीन लहान मुलांसोबत पाच जण जखमी झाले होते. यानंतर शहरात सगळीकडे दंगल सुरू झाली. यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका 40 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे.
याबाबत अधिक तपास सुरू आहे. ही व्यक्ती एक आयरिश नागरिक असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर, शहरातील स्थलांतर-विरोधी संघटनांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने सुरू केली. पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाद झाला, आणि त्यानंतर दंगल सुरू झाली. या दंगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. एक डबल डेकर बस पेटवल्याची घटना घडली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉलिडे इन हॉटेल आणि मॅकडॉनल्डच्या काचा देखील फोडण्यात आल्या. जवळच्या एका दुकानात लूटमार झाली. यासोबतच एक पोलीस व्हॅन देखील जाळण्यात आली आहे.