नांदुरा : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील साठ वर्षीय अब्दुल रहीम अब्दुल सत्तार हे नांदुरा पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र त्यांची चोरीची फिर्याद ऐकल्यावर ठाणेदारासह समस्त पोलीस कर्मचारी थक्क झाले, याचे कारण म्हणजे झालेली चोरी ही दागिने, रोख रक्कम वा वाहनाची देखील नव्हती, तर ही चोरी होती चक्क गाढवांची, कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने सहा दिवसांत एक दोन नव्हे तर तब्बल १७ गाढवे चोरून नेल्याने मालक त्रस्त झालेत.
चोरी गेलेल्या गाढवांमध्ये अब्दुल रहीम यांच्या ४ तर इतरांच्या १३ गाढवांचा समावेश आहे. शहरातील १७ गाढव अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी गाढवांच्या मालकांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसात २८ डिसेंबर रोजी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा खुर्द येथील रहिवासी अब्दुल रहीम अ. सत्तार (वय ५९) यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या मालकीचे चार गाढव तसेच गावातील इतर लोकांचे १३ गाढव अज्ञात चोरट्यांनी नांदुरा शहरातून चोरून नेले. गाढवांची किंमत ८५ हजार रुपये आहे.
याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या चोरीचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मिलिंद जवंजाळ करीत आहेत. गाढवांची चोरी कशाकरिता करण्यात आली व कुणी केली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान नांदूराच नव्हे तर जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतात झालेली ही अफलातून चोरीची घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.