गडचिरोली : मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी 11 वाजाताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. स्थानिकांच्या मते, सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला असेल. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला मिरची तोडणीला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाव उलटली. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वाचवण्यात अपयश आले. एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. पाच महिलांचा शोध घेणं अद्याप सुरुच आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्याशिवाय ज्या ठिकाणी नाव बुडाली त्या नदी किनाऱ्यावर गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे, पण अद्याप यश मिळाले नाही.